गुवाहाटी : खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिसऱ्या पर्वात महाराष्ट्राच्या मुलांनी कबड्डीत विजयी श्रीगणेशा केला. महाराष्ट्राच्या 17 आणि 21 वर्षांखालील संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर सहज विजय मिळविले.
महाराष्ट्राच्या 21 वर्षांखालील संघाने गुजरातचा 50-42 असा पराभव केला. त्यानंतर अखेरच्या सामन्यात 17 वर्षांखालील संघाने छत्तीसगढ संघावर एकतर्फी लढतीत 51-28 अशी सहज मात केली.
महाराष्ट्राच्या शुभम पठारेच्या चढाया इतक्या जबरदस्त होत्या की छत्तीसगढचा बचाव पूर्णपणे खिळखिळा करून टाकला होता. त्याला कृष्णा शिंदे आणि दिग्विजय जमदाडेची सुरेख साथ मिळाली.
त्यापूर्वी, 21 वर्षांखालील सामन्यात महाराष्ट्राच्या पंकज मोहितेच्या चढायांनी महाराष्ट्राचा मार्ग सुकर करण्यास सुरुवात केली. त्याच्या चढाया गुजरातच्या बचावपटूंसाठी आव्हानात्मक ठरत होत्या.
वेगवान चढाया महाराष्ट्राच्या खेळाचे वैशिष्ट्य ठरत होत्या. बचावपटूंकडून होत असलेल्या चुकांनंतरही महाराष्ट्राने मध्यंतराला 22-14 अशी
आघाडी मिळविली.
पहिल्याच दिवशी किटचा घोळ
महाराष्ट्रच नाही, तर अनेक राज्याच्या खेळाडूंना वेळेवर किट उपलब्ध होऊ न शकल्यामुळे कबड्डीच्या सामन्यांना या ना त्या कारणाने उशीर होत राहिला. महाराष्ट्राच्या 17 वर्षांखालील मुलांचे किट तर दुपारचे सत्र संपताना 4.30 वाजता आले. त्यामुळे महाराष्ट्राचा सामना उशिराने खेळवावा लागला.