माण-खटावमध्ये पारधी महिलेला संधी देणार
सातारा – महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी राज्यात 76 विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करणार असून सातारा जिल्ह्यात माण-खटाव मतदारसंघातून पारधी समाजातील महिलेला संधी देणार असल्याची घोषणा वंचित आघाडीचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले, राष्ट्रवादी व कॉंग्रेस आघाडीशी आमची महत्त्वांच्या जागांबाबत दोन महिन्यांपासून चर्चा सुरू होती. प्रत्यक्षात त्यांनी आम्हाला चर्चेत गुंतवून खेळवत ठेवले. त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरत असून महाराष्ट्र वंचित आघाडी 76 जागा लढवणार आहे. कोल्हापूर, पुणे, सोलापूर, लातूर, बुलढाणा, जळगाव, अमरावती, मुंबई,ठाणे, कल्याण, अकोला नाशिक, परभणी, नागपूर या जिल्ह्यांमध्ये बौध्द, मातंग, वडार, कैकाडी, मुस्लिम, मराठा बौद्ध, वंजारा, कोल्हाटी अशा जमातींच्या उमेदवारांना संधी देण्यात येत आहे.
मी स्वतः पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी भाजप-शिवसेना यांच्या विरोधात काम करणार आहे. तो आमच्या आघाडीचा अजेंडा आहे. गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या विषयावर भाजपला केलेला विरोध हे केवळ ढोंग होते, हे आता सिद्ध झाले आहे. त्यांना भाजपकडून बारामतीची उमेदवारी मिळाल्याने त्यांचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे असल्याचे सिध्द झाले आहे.