पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुण्यातील अमनोरा टाऊनशीपचे विकसक असलेल्या सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे आयोजित ६३ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू आहे. आज झालेल्या कुस्ती स्पर्धेत थरारक निकाल पहायला मिळाले आहेत. महाराष्ट्र केसरी किताबासाठी प्रबळ दावेदार मानल्या जात असलेल्या मल्लांना आज पराभव पहायला मिळाला आहे.
गतवर्षीचा विजेता महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख आणि उप महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके या दोघांनाही स्पर्धेत पराभव पत्कारावा लागला आहे. हे दोघेही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतूनच बाहेर पडले आहेत. त्यामुळे यंदा नवा महाराष्ट्र केसरी मिळणार आहे.
आज माती विभागात गतविजेता बाला रफिक शेखचा सोलापूरच्या ज्ञानेश्वर उर्फ माऊली जमदाडे यांनी पराभव केला आहे. बाला रफीकचा पराभव करणा-या माऊली जमदाडेलाही आपला विजय फार काळ टिकवता आला नाही आणि पुढच्याच फेरीत लातूरच्या शैलेश शेळकेने माऊली जमदाडेला चितपट करत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
तर दुसरीकडे गतवर्षीचा उपविजेता अभिजीत कटकेचा गादी विभागात नाशिकच्या हर्षल सदगीरने ५-२ असा पराभव करुन थेट महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
त्यामुळे आता महाराष्ट्र केसरी या किताबासाठी नाशिकचा हर्षवर्धन सदगीर (गादी विभाग) आणि लातूरच्या शैलेश शेळके (माती विभाग) यांच्यात उद्या म्हणजे मंगळवारी (७ जानेवारी) अंतिम लढत होणार आहे. विशेष म्हणजे दोन्हीही मल्ल काका पवार यांच्या तालमीतील आहेत. आता उद्या हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके यांच्यात कोण बाजी मारणार आणि महाराष्ट्र केसरी किताब पटकवणार याकडे सा-या महाराष्ट्राचं लक्ष्य लागलं आहे.