मंदीच्या सावटाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसणार : राज ठाकरे

वसंत मोरे यांच्या प्रचारार्थ हडपसरमध्ये सभा

कात्रज – तुमचे हडपणारा नेता हवा, की तुम्ही भरभरुन देणारा हवा? हे ठरवण्याची वेळ आली आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आता अमिषे दाखविली जातील, जाती-पातीचे राजकारण केले जाईल. पण, अशा कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता तुम्ही विकासाचे मॉडेल राबवणाऱ्या उमेदवारालाच साथ द्या, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी केले.

हडपसर विधानसभा मतदार संघातील मनसेचे उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचारार्थ हडपसर येथील बंटर हायस्कुल येथे ठाकरे यांची सभा झाली. ठाकरे म्हणाले, “यंदाची निवडणूक मतदारांनी गांभिर्याने घेतली पाहिजे. देश आणि राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. मंदीच्या सावटाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसणार आहे. सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षांत राज्याचे वाटोळे केले. पाच लाख उद्योगधंदे बंद पडले आहेत. रोजगार गेले आहेत. सत्ताधारी नेत्यांच्या डोक्‍यामध्ये हवा गेली आहे, ती काढण्याची हीच योग्य वेळ आहे. एक सक्षम विरोधी पक्ष हवा आहे, त्यासाठी मनसेला मतदान करा, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

तुम्ही हडपसरमधून मनसेच्या उमेदवाराला निवडून आणा, मतदार संघाचा चेहरामोहरा बदलविण्याची जबाबदारी मी घेतो, असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी व्यासपीठावर मनसेचे उमेदवार वसंत मोरे, कोंढवा येथील नगरसेवक साईनाथ बाबर, राजेंद्र उर्फ बाबू वागस्कर, आरती बाबर, वनिता वागस्कर, गणेश सातपुते, योगेश खैरे,अनिल शिदोरे हे उपस्थित होते.

कोथरूडमध्ये उमेदवार लादल्याची टीका
कोथरूडच्या मतदारांना गृहीत धरून त्यांच्यावर बाहेरचा उमेदवार लादण्यात आल्याची टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोथरूडमध्ये केली. या मतदारसंघाची निवडणूक सोपी असून मतदारांनी त्यांचा आमदार कोथरूडचा पाहिजे, की बाहेरचा? ऐवढेच आता ठरवायचे आहे, असे ठाकरे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.