Maharashtra Weather : राज्यात दोन दिवसांपासून वातावरण कोरडे झाले असल्याने किमान तापमानात घसरण झाली आहे. त्यामुळे दिवसा आणि रात्रीही गारठा वाढला आहे. रविवारी धुळे येथे नीचांकी ८.५ अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली आहे.
आगामी पाच ते सहा दिवस वातावरण कोरडे रहाणार असल्याने राज्यात थंडी जाणवेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.
उत्तर भारतात एकामागे एक पश्चिमी चक्रावात येत असल्याने जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या ठिकाणी हिमवर्षाव होत आहे. तर राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्लीमध्ये दाट धुके आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडी वाढली आहे.