Maharashtra Tur Procurement : महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीस केंद्र सरकारने मंजुरी दिली असून, याचा थेट लाभ राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत तूर खरेदीसंदर्भातील संपूर्ण आढावा घेण्यात आला असून, शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळावा यावर विशेष भर देण्यात आला, असे मंत्री रावल यांनी स्पष्ट केले. या निर्णयानुसार सन २०२५-२६ या हंगामासाठी शेतकऱ्यांकडून ८ हजार रुपये प्रति क्विंटल या किमान हमीभावाने (MSP) तुरीची खरेदी केली जाणार आहे. या खरेदीसाठी २० जानेवारी २०२६ पासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत नोंदणी सुरू राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तूर खरेदीची प्रक्रिया नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) या केंद्रीय संस्थांमार्फत, राज्य सरकारच्या समन्वयाने राबवली जाणार आहे. यासाठी राज्यभरात ९३४ खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. Maharashtra Tur Procurement MSP 2026 संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक खरेदी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, सुलभ आणि जलद गतीने राबवण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. गरज भासल्यास राज्यातील १०० टक्के तूर खरेदीसाठी केंद्र सरकारकडे अतिरिक्त प्रस्ताव पाठवण्यात येईल, असंही मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं. या निर्णयामुळे राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, उत्पादनाला योग्य दर मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होणार आहे. हेही वाचा : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी…! तूर खरेदीला केंद्र सरकारकडून २८ मेपर्यंत मुदतवाढ; किती मिळणार हमीभाव, जाणून घ्या सविस्तर…