मुंबई – राज्याच्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी राज्यातील नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. सत्ताधारी आमदारांनी केलेला खास पेहराव, विरोधकांचा बहिष्कार, घोषणाबाजीमुळे आजचे विशेष अधिवेशन खरोखरच विशेष ठरले.
महायुती सरकारच्या पहिल्याच अधिवेशनासाठी शिंदेसेना तसेच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या आमदारांनी केलेला पेहराव चर्चेचा विषय ठरला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदारांनी भगवे फेटे घालून तर अजित पवारांच्या आमदारांनी गुलाबी फेटे घालून विधानभवनात प्रवेश केला. मात्र, आज शपथविधी सोहळ्याच्या पहिल्याच अधिवेशनात विरोधकांनी सभात्याग केला.
सत्ताधारी आमदारांचे शपथविधी सुरु असतानाच आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह विरोधकांनी सभात्याग केला. यामुळे पहिल्या दिवशी एकाही विरोधी आमदाराने शपथ घेतली नाही. आता उद्या विरोधी पक्षांच्या आमदारांचा शपथविधी होणार आहे.
नवनिर्वाचित 78 आमदार –
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच निवडणूक लढवत 78 आमदारांनी विधानसभेत प्रवेश केला आहे. ठाकरेसेनेमधून 10, काँग्रेसचे सहा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधून 6 आमदार पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीत 25 ते 45 वर्ष वयोगटातील फक्त 57 आमदार आहेत. 1970च्या विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ही संख्या सर्वात कमी असल्याचे समोर आले आहे.