फलटण – फलटण येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेत 14 वर्षाखालील वयोगटात महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलींच्या संघानेही विजेतेपद पटकावले. मुलांच्या संघाने तेलंगणाच्या संघावर एक डाव गुणाने मात केली तर
मुलींच्या संघाने गुजरातच्या संघाला एक डाव पाच गुणांनी धुळ चारली.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा व फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण यांच्या संयुक्त सहभागाने आयोजित करण्यात आलेल्या 65 व्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेचा समारोप बुधवारी झाला. सदर राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये देशातील विविध राज्यातील मुला/मुलींचे 27 संघामधील 622 खेळाडू, संघ व्यवस्थापक, क्रीडा मार्गदर्शक यामध्ये सहभागी झाले होते.
गेले चार दिवस सुरु असलेल्या या स्पर्धेतील अंतिम लढती रात्री उशीरा चुरशीने व अटी तटीने पार पडल्या. त्यानंतर आयोजित समारोप समारंभास विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, क्रीडा व युवक सेवा, आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, आ. दीपकराव चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, तालुका क्रीडा अधिकारी अनिल सातव, खंडाळा तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे, फलटण नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर, नगर सेवक/नगरसेविका उपस्थित होते.
आजच्या दिवसाचे सर्व सामने चुरशीचे झाले. मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने गुजरातवर एक डाव पाच गुणांनी तर महाराष्ट्र मुलांच्या संघाने तेलंगणा संघावर एक डाव एक गुणाने विजय मिळविला. तृतीय क्रमांकासाठी खेळविल्या गेलेल्या सामन्यात दिल्लीच्या मुलांच्या संघाने आंध्र प्रदेशवर दोन गुणांनी विजय मिळविला तर मुलींच्या पश्चिम बंगाल संघाने ओरीसावर दोन गुणांनी विजय मिळविला. यावेळी मुलांमध्ये उत्कृष्ट संरक्षक, उत्कृष्ट आक्रमण व सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान अनुक्रमे महाराष्ट्राचा रवी वसावे, तेलंगणाचा व्ही जानकीरमण व महाराष्ट्राचा वैभव मोरे यांना तर मुलींमध्ये अनुक्रमे गुजरातची हर्षदा मकवाना, महाराष्ट्राच्या भाग्यश्री बडे व अंकिता लोहार यांना मिळाला.