प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 18 -महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतर तेव्हाच्या सरकारने जादूटोणा विरोधी कायदा लागू केला होता. त्यानंतर महाराष्ट्रात तीन वेळा सरकार बदलले; परंतु कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अपेक्षित नियम करण्यासाठी अजून कोणत्याही सरकारला वेळ मिळाला नाही, ही अत्यंत खेदाची बाब असून, नवीन सरकार तरी हे नियम करणार का, असा सवाल महाराष्ट्र “अंनिस’तर्फे मुक्ता दाभोलकर आणि डॉ. हमीद दाभोलकर यांनी केला आहे.
जादूटोणा विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्याचा प्रमुख भाग म्हणून जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम तातडीने तयार करावेत, अशी अपेक्षा दाभोलकर यांनी व्यक्त केली आहे.
सरकारच्या वतीने जादूटोणा विरोधी कायदा अंमलबजावणीसाठी पुरेसे प्रयत्न होत नसले तरी महाराष्ट्र अंनिस आणि सजग नागरिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रात गेल्या नऊ वर्षांत एक हजारहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. लोकांचे शोषण करणाऱ्या सर्व धर्मातील बाबा-बुवांनाही शिक्षा झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र अंनिस कार्यकारी समिती सदस्य नंदिनी जाधव आणि मिलिंद देशमुख यांनी दिली.
दाभोलकर स्मृतिदिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रम
ऑल इंडिया पीपल सायन्स नेटवर्क आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन (20 ऑगस्ट) “राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस’ म्हणून पाळला जातो. या दिवशी अंधश्रद्धा निर्मूलन आणि डॉ. दाभोलकर यांच्या संबंधात गेल्या नऊ वर्षांत वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांचे श्रीपाल ललवाणी यांनी केलेल्या संकलन प्रदर्शनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते शनिवारी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्रातील संत, समाजसुधारकांची परंपरा आणि अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ या विषयावर साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांचे व्याख्यान होणार असून, अभिनेते सयाजी शिंदे या वेळी उपस्थित राहणार आहेत.