Maharashtra State Table Tennis C’ship 2024 (Pune) | – यजमान पुणे संघाने सतरा वर्षाखालील मुले व मुली या दोन्ही सांघिक विभागात विजेतेपद मिळविताना राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळविला. पुरुष गटात ठाणे संघाने अजिंक्यपद मिळवले तर महिलांमध्ये मुंबई शहर संघ विजेता ठरला.
मुलांच्या सतरा वर्षाखालील गटात पुणे संघाने विजेतेपद पटकावताना टी एस टी मुंबई संघावर ३-१ अशी मात केली. त्यावेळी एकेरीच्या पहिल्या लढतीत पुण्याच्या ईशान खांडेकर याने अर्णव क्षीरसागर याला ११-५,११-५,११-७ असे पराभूत केले मात्र ध्रुव शहा याने पुण्याच्या शौरेन सोमण याला ६-११,११-९,११-५,८-११,११-१ असे पराभूत करीत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली तथापि कौस्तुभ गिरगावकर या पुण्याच्या खेळाडूने नंतरच्या एकेरीत युवराज यादव याचा ११-८,१२-१०,११-७ असा पराभव केला आणि सामन्यात पुण्यास २-१ अशी आघाडी मिळवून दिली. एकेरीच्या परतीच्या सामन्यात ईशान खांडेकर याने ध्रुव शहा याचा ८-११,११-८,१२-१०,११-५ असा पराभव करीत पुण्यास विजेतेपद मिळवून दिले
मुलींच्या सतरा वर्षाखालील गटाच्या अंतिम लढतीत पुणे संघाने टीएसटी मुंबई संघावर अशी मात केली त्यावेळी एकेरीच्या पहिल्या सामन्यात पुण्याच्या सई कुलकर्णी हिला पूर्वी चुरी हिने ११-७,११-६,११-८ असे पराभूत केले. मात्र नैशा रेवसकर या पुण्याच्या खेळाडूने वैष्णवी जयस्वाल हिचा ८-११,१४-१२,११-२,८-११,१२-१० असा पराभव करीत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. पाठोपाठ पुण्याच्या जान्हवी फणसे हिने निवा चौगुले हिचा ३-११,१३-११,११-९, १४-१६,११-६असा पराभव केला. रेवसकर हिने एकेरीच्या परतीच्या सामन्यात चुरी हिचा ११-५, १२-१०,११-९ असा पराभव करीत पुण्याच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
U19 Asia Cup 2024 | पाकिस्तानचे भंगले स्वप्न, भारत आणि बांगलादेशमध्ये रंगणार विजेतेपदाची लढत…
महिलांच्या सांघिक विभागातील अंतिम लढतीत मुंबई शहर संघाने टीएसटी मुंबई संघाचा ३-० असा पराभव करत अजिंक्यपद पटकावले. पुरुषांच्या अंतिम सामन्यात ठाणे संघाने नागपूरचा ३-० असा पराभव करत अजिंक्यपद पटकावले.