पुणे – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांच्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन इमेजेस आता उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध होणार आहेत.
उमेदवारांना दोन भागाची उत्तरपत्रिका देण्यात येतात. त्यात भाग-1 हा मूळ प्रत असून तो परीक्षेनंतर आयोगाच्या कार्यालयाकडे जमा होतो. भाग-2 हा कार्बन प्रत असतो. तो परीक्षेनंतर सोबत घेऊन जाण्याची मुभा उमेदवारांना असते. उमेदवारांने परीक्षेवेळी त्यांची उत्तरे उत्तरपत्रिकेवर आयोगाच्या सूचनानुसार व उत्तरपत्रिकांवर सविस्तरपणे नमूद केलेल्या सूचनाप्रमाणे वर्तुळ छायांकित करून नोंदविणे आवश्यक आहे.
उत्तरपत्रिकेच्या भाग-2 वरून उमेदवारास त्याने संबंधित परीक्षांमध्ये छायांकित केलेली उत्तरे आयोगाकडून प्रसिद्ध केलेल्या उत्तरतालिकेवरून पडताळून पाहता येतात. त्यावरून उमेदवारांना प्राप्त होऊ शकणाऱ्या गुणांचा अंदाज बांधता येतो.
उमेदवारांना त्यांनी संबंधित परीक्षेमध्ये प्रत्यक्ष प्राप्त केलेले अचूक गुण ज्ञात व्हावेत व उमेदवारास परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या संदर्भात कोणतीही शंका राहू नये. याकरिता संबंधित परीक्षेच्या निकालानंतर त्यांच्या वैयक्तिक प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.