SSC Result 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी – मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी (दि.८) दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे. याबाबत राज्य मंडळाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आता निकालाची उत्सुकता निर्माण झालेली आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत इयत्ता दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेसाठी राज्यातील एकुण १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एकुण ५ हजार १११ केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण संकेतस्थळांवर उपलब्ध होतील. माहितीची प्रत प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे डिजीलॉकर अॉपमध्ये डिजीटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर शाळांना त्यांच्या शाळांचा एकत्रित निकाल उपलब्ध होणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी दिली आहे. ऑनलाईन निकालानंतर दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard वरून स्वत: किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळसाठी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी ९ ते २३ मे पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येणार आहेत. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईनद्वारे अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत्र मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत आत पुनर्मूल्यांकन कार्यपध्दतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी जून-जुलै २०२६, फेब्रुवारी-मार्च २०२७ व जून-जुलै २०२७ यानुसार श्रेणी, गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहणार आहेत. जून-जुलै २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने अर्ज घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार आहे. निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ १ – https://results.digilocker.gov.in २ – https://mahahsscboard.in ३- https://sscresult.mkcl.org