Maharashtra heatwave : विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम असून नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये गुरुवारी तापमानाने ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४७.१ अंश तापमानाची नोंद झाली असून चंद्रपूरमध्ये ४६.८ अंश, तर वर्धा आणि गडचिरोली येथे प्रत्येकी ४६.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. नागपुरातही पारा ४६ अंशांवर पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून पुढील पाच ते सात दिवस उष्णतेची लाट आणखी तीव्र राहण्याचा इशारा दिला आहे. दुपारच्या वेळेत नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्माघातापासून बचावासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरचे हवामानतज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी सांगितले की, पूर्व विदर्भातील अनेक भागांमध्ये तापमान ४६ ते ४७ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. विशेषतः ब्रह्मपुरी, गडचिरोली आणि आसपासच्या भागांत तीव्र उष्णतेचा फटका अधिक जाणवणार आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला असून येथे ‘हीटवेव्ह टू सिव्हिअर हीटवेव्ह’ची परिस्थिती निर्माण होऊ शकते. चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी यलो व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत दिवसा आणि रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, बुधवारी वर्ध्यात ४७.१ अंश तापमानाची नोंद झाली होती. यंदाच्या हंगामात नागपूरने प्रथमच ४६ अंशांचा टप्पा पार केल्याने उष्णतेची तीव्रता अधिक वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.