मुंबई – देशात एकूण 35 लाख 61 हजार 379 गुन्हे दाखल झाले असून त्यातील 3 लाख 74 हजार 38 गुन्हे एकट्या महाराष्ट्रात नोंदविले गेले आहेत. हा दर 10.2 टक्के इतका असून महाराष्ट्र देशात गुन्हेगारीत क्रमांक दोनवर आहे. देशात स्त्री अत्याचाराचे 4 लाख 45 हजार गुन्हे दाखल झाले असून 45 हजार गुन्हे एकट्या महाराष्ट्रात दाखल आहेत.
ॲसिड हल्ले, सायबर गुन्हे यात महिलांचे प्रमाण अधिक आहेत. एकीकडे सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे; मात्र प्रत्यक्षात महिलांचे संरक्षण करण्यास सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज, शुक्रवारी (12 जुलै) समारोप झाला आहे. येत्या तीन महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार असल्याने विरोधकांनी यंदाच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला.
आज शेवटच्या दिवशी विधान परिषदेत 260 अनव्ये प्रस्ताव आणि अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. यावेळी अंबादास दानवे यांनी महाराष्ट्रातील गुन्हेगारीवरून सरकारवर परखड टीका केली.
अंबादास दानवे म्हणाले, मुख्यमंत्री यांचा बुलडोझर फक्त काही भागात चालत असून ते कामापेक्षा शोबाजी करत असून राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
हे सरकार मोठ मोठया घोषणा सर्वसामान्यांसाठी नव्हे तर कंत्राटदारांच्या हितासाठी करतो, अशा शब्दांत दानवे यांनी 260 अनव्ये प्रस्तावावर बोलताना सरकारने केलेल्या विविध घोषणांवर सरकारवर निशाणा साधला.