मुंबई : फडणवीस सरकारच्या शपथविधीनंतर आता मंत्रिमंडळ आणि विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. महायुतीतील मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने विधानसभा अध्यक्षपदावरील आपला दावा कायम ठेवला आहे. या पदासाठी विद्यमान अध्यक्ष राहिलेले राहुल नार्वेकर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. परंतु भाजपकडून मोठा उलटफेर होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि किसन कथोरे यांच्यावर नवीन जबाबदारी सोपविणार असल्याचे समजते.
राहुल नार्वेकर यांना परत विधानसभा अध्यक्ष होण्यात फारसा रस नाही. त्यांना कॅबिनेट मंत्रिपद हवे आहे. मात्र मुंबईमधून जर मंगल प्रभात लोढा यांना कॅबिनेटपदी वर्णी लावायचे असेल तर नार्वेकरांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणे कठीण आहे. मुंबई उपनगरात देखील अनेक जण कॅबिनेट मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. त्यात आशिष शेलार, अतुल भातकळकर, अमित साटम अशी नावे आघाडीवर आहेत.
आगामी काळात मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे उत्तर भारतीय तसेच इतर समाजातील लोकांना देखील संधी द्यावी लागणार आहे. यामुळे दक्षिण मुंबईत मलबार हिल आणि कुलाबा असे आजूबाजूला लागून असलेल्या मतदारसंघात दोन कॅबिनेट मंत्रीपद देणे शक्य वाटत नाही. चंद्रकांत पाटील यांनी या आधी भाजप प्रदेशाध्यक्ष, महसूल, सार्वजनिक बांधकाम, सहकार अशी महत्त्वाची खाती सांभाळलेली आहेत.
गेल्या काही कालावधीमध्ये पाटील यांनी उच्च तंत्र शिक्षण तसेच पुणे पालकमंत्रीपद देखील पाहिले आहे. आता पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांला प्रदेशाध्यक्ष ऐवजी विधानसभा अध्यक्षपद देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच मुनगंटीवार हे पक्षाचे जेष्ठ नेते आहेत. त्यांना कामकाजाची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आता ते कॅबिनेटमध्ये असतील की नाही याची चर्चा आहे. मात्र त्यांचे पुनर्वसन म्हणून विधानसभा अध्यक्षपदावर त्यांची नियुक्त होवू शकते अशी चर्चा आहे. त्याच बरोबर किसन कथोरे यांच्या नावाचीही चर्चा आहे.