बारामती : लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिला होता. कारण या निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रीया सुळे अशी लढत झाली होती. यामध्ये सुप्रिया सुळेंनी बाजी मारत ही निवडणूक जिंकली होती तर सुनेत्रा पवारांचा पराभव झाला होता. यानंतर आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे. पवार घराण्यातील आता चौथी पिढी राजकारणात येताना दिसणार आहे.
जय पवार लढवणार निवडणूक?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे पूत्र जय पवार यांना विधानसभेचं तिकीट मिळू शकते. बारामती विधानसभेबाबत अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलंय. जय पवारांच्या उमेदवारीबाबत अजित पवारांनी संकेत दिलेत. कार्यकर्त्यांची मागणी असेल तर जय पवारांना संधी देऊ असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याअगोदर बारामती मतदारसंघात शरद पवार गटाकडून युगेंद्र पवारांना तिकीट दिले जाऊ शकते. त्यामुळे बारामती विधानसभेत जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत पाहायला मिळू शकते.
कोण आहेत जय पवार?
जय पवार हे बारामतीतल्या समाजकारणात सक्रीय आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जय पवार यांनी पक्ष कार्यात सहभाग घेतला. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांची धुरा जय पवारांनी सांभाळली होती. लोकसभा निवडणुकीनंतर जय पवार बारामतीत अजित पवार नसताना जनता दरबार घेत होते. जय पवार यांनी आंतरवली सराटी इथं जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली होती.
कोण आहेत युगेंद्र पवार?
युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. शरद पवार यांनी स्थापन केलेल्या विद्या प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे ते खजिनदार आहेत. तसंच बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत. बारामतीमधील सामाजिक कार्यात ते सक्रिय आहेत. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात राजकीय भूमिका घेतल्यानंतर श्रीनिवास पवार आणि युगेंद्र पवार हे मोठ्या पवारांसोबत राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीत युगेंद्र यांनी सुप्रिया सुळे यांचा जोरदार प्रचार केला होता. या निवडणुकीत बारामती विधानसभेत सुप्रिया सुळे यांना मोठी आघाडी मिळाली होती. तेव्हापासूनच युगेंद्र पवार यांचं नाव बारामती विधानसभेसाठी मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते.