मुंबई : राज्यात सध्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापले आहे. राज्यात अनेक ठिकाणी पक्षाने तिकीट न दिल्यामुळे बंडखोरी होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे गटाने आपली ६५ जणांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये त्यांनी शिवडीची जागा जाहीर केली नव्हती. यानंतर आता शिवडीच्या जागेचा तिढा सोडवण्यात ठाकरेंना यश आले आहे.
अजय चौधरींना उमेदवारी जाहीर
शिवडी मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी विद्यमान आमदार अजय चौधरींना उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवडी विधानसभेबाबत ठाकरेंच्या शिवसेनेत पेच सुरु होता. विद्यमान आमदार अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्यामध्ये शिवडीची जागा मिळवण्यासाठी रस्सीखेंच सुरु होती.अखेर आज उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांशी संवाद साधून शिवडी विधानसभेची जागा जाहीर केली आहे.
मनसे विरुद्ध ठाकरे होणार लढत
या मतदारसंघातून मनसेने बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर केली तर ठाकरे गटाकडून या ठिकाणी अजय चौधरींना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी मनसे विरुद्ध ठाकरे अशी लढत होणार आहे. तसेच सुधीर साळवी यांच्या भूमिकेकडेदेखील संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.