मुंबई – करोना विषाणू महासाथ अनेकांसाठी संकटांचा डोंगर घेऊन आली आहे. काहींना विषाणूचा संसर्ग झाल्याने आपल्या जवळच्या व्यक्तींना गमवावं लागलंय, तर लॉकडाऊनमुळे काहींवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशा संकटसमयी माणुसकीच्या नात्याने मदत करण्यासाठी समाजातील काही हात पुढे येतायेत. असाच एक मदतीचा हात म्हणजे महिला पोलीस कॉन्स्टेबल रेहाना शेख.
रेहाना शेख यांनी करोना संकटात अनेकांना मदत केली. यावर्षी आलेली करोनाची दुसरी लाट शिखरावर असताना त्यांनी गरजूंना ऑक्सिजन, रक्त, प्लाझ्मा पुरवला. एवढंच नव्हे तर या ४० वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबल रेहाना यांनी, ५० विद्यार्थ्यांच्या १०वी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारीही स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे.
याबाबत बोलताना त्या सांगतात, “गतवर्षी आम्ही माझ्या मुलीच्या वाढदिवसाची तयारी करत असतानाच मला रायगड जिल्ह्यातील वाजे तालुक्यात असलेल्या ज्ञानी विद्यालयाबाबत माहिती मिळाली. मी तेथील मुख्याध्यापकांशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला शाळेला भेट देण्याचे निमंत्रण दिले. तिथे गेल्यानंतर मला समजलं की या मुलांना आपल्या मदतीची गरज आहे. येथील सर्व विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती बेताची असून काहींच्या पायात चप्पल सुद्धा नाही. मी माझ्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जमवलेले पैसे व इटच्या खरेदीसाठी साठवलेली रक्कम या मुलांच्या शिक्षणासाठी वापरण्याचा निर्णय घेतला.”
आपल्या समाजकार्याच्या प्रेरणेमागे २०२०मध्ये घडलेली एक घटना असल्याचं त्यांनी सांगतात. “माझ्या एका पोलीस सहकाऱ्याने मला गतवर्षी, आपल्या आईसाठी एक इंजेक्शन लागत असल्याचे सांगून त्यासाठी मला मदत मागितली. मी लगेच काही ओळखीच्या लोकांना फोन करत ते मिळवून दिले. आपल्यामुळे कोणाला तरी मदत झाली हा अनुभवच माझ्या समाजकार्यामागील प्रेरणा ठरला,” असं त्या सांगतात.
रेहाना शेख यांच्या या कार्यासाठी त्यांचा महाराष्ट्र पोलिसांतर्फे सत्कार करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी उत्कृष्ट सामाजिक कार्य केल्याबाबत त्यांचा सत्कार केला.
दरम्यान, रेहाना शेख यांना समाजकार्याची आवड असल्याने त्यांच्या पतीने त्यांना मदर तेरेसा असं नाव दिल आहे.