मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील 6, पुणे 1, सोलापूर शहर 1, नाशिक ग्रामीण 1 अशा 9 पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. 127 पोलीस अधिकारी व 1026 पोलीस कर्मचारी असे एकूण 1,153 पोलीस हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
कालपर्यंत (14 मे) कोरोना पाॅझिटिव्ह पोलीसांची संख्या 10 7 पोलीस अधिकारी व 894 पोलीस कर्मचारी असे मिळून एकूण 1001 अशी होती, मात्र आज ही संख्या 1,153 वर पोहचली आहे. गेल्या दोन दिवसात 152 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे.
पोलिस कोरोना कक्ष…
पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. 22 मार्च ते 14 मे या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या 229 घटना घडल्या. त्यात 803 व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.