पाटणा – बिहारला देशाची राजकीय प्रयोगशाळा मानले जाते. आर्थिक दृष्ट्या हे राज्य भलेही मागास असेल, मात्र राजकीय दृष्ट्या येथील मतदार प्रगल्भ आणि जागरूक असल्याचे वेळोवेळी जाणवले आहे.
मात्र या मतदारांचे राजकीय लाभासाठी जातींमध्ये विभाजून करून आपली पोळी भाजण्यात काही नेते यशस्वी ठरले असल्याचा विरोधाभासही या राज्यात पाहायला मिळाला आहे. यंदा मात्र बिहारमधील स्थिती अधिकच बुचकळ्यात टाकणारी आहे.
केंद्रात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असणारे दोन प्रमुख पक्ष बिहारमध्ये परस्परांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत. तर खुद्द मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल आणि भाजप यांच्यात संशय कल्लोळ सुरू आहे.
त्यामुळे आघाडी आणि रालोआ यांच्यात लढत दिसली असली तरी निवडणुकीनंतर त्यातही फाटाफूट होउन तिसरा पर्याय समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बिहारचा राजकीय अभ्यास करणाऱ्या जाणकारांच्या मते यंदा असेच काहीसे होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे कदाचित भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न राबवत विरोधक एकत्र येउ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.
लालूप्रसाद यादव यांच्या अनुपस्थितीत त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी निवडणून लढवत आहे. त्यात कॉंग्रेसचाही समावेश आहे. लालूंची सक्रिय उपस्थिती नसल्यामुळे व त्यांच्या गतकाळातील घोटाळ्यांच्या प्रभावातून बाहेर पडण्याचे आव्हान तेजस्वी यांच्यासमोर आहे.
तेजस्वी यांचे नेतृत्व मान्य करण्यास राजदचे बडे नेते कसेबसे तयार झाले आहेत. मात्र भाजपची ताकद, नितीश यांची शासकीय यंत्रणा आणि मतदारांवर थेट प्रभाव पाडू शकतील अशा मुदद्दयांचा त्यांच्याकडे तूर्त आभाव दिसतो आहे. मात्र जनतेची सरकारवर असलेली नाराजी हा कळीचा मुद्दा त्यांना अनुकूल ठरू शकतो.
बिहारमध्ये 2005 पासून नितीश यांची राजवट आहे. मध्यतंरी भाजपशी काडीमोड करून ते महाआघाडीच्या मांडवाखाली जाउन आले आहेत. मात्र यंदा कारकीर्दीत प्रथमच नितीश यांना इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या नाराजीचा सामना करावा लागतो आहे. त्याला कारण म्हणजे करोनाचे बळी आणि करोनाकाळात स्थलांतरित मजुरांचे झालेले हाल.
महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यांत मोठ्या प्रमाणावर बिहारी कामगार काम करतात. करोनामुळे नोकरीचे संकट उदभवल्यावर या कामगारांनी आपल्या राज्याची वाट धरली. पण त्यांना ना रोजगार मिळाला, ना जाण्यासाठी वाहन अन ना कुटुंबीयांचे पोट भरण्यासाठी पुरेसे अन्न. अशा स्थितीत नाराजीचा पारा वर आहे.
त्यातच लोकजनशक्ती पक्षाचे चिराग पासवान नितीश यांच्यावरच निशाणा धरून आहेत. त्यांनी जनता दलाच्या उमेदवारांवरच नेम धरला आहे. ते नितीश यांच्यावर तोफ डागताना भाजपबद्दल मात्र मौन धरून आहेत.
खुद्द नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील प्रचारसभेत सगळ्यांवर तोफ डागली. मात्र लोकजनशक्ती बाबत ब्र काढला नाही. त्यामुळे आतून भाजपच चिराग यांना रसद पुरवत असल्याच्या आरोपांना बळकटी मिळते आहे.
तिसऱ्या आघाडीचा पर्याय लहान पक्षांनी मिळून तयार केला आहे. मात्र त्यातील एकही नेता विश्वासार्ह नाही. महाआघाडीत तेजस्वी यांच्या नेतृत्वाबद्दल कुरबुर नाही. पण त्यांना लोकसभेप्रमाणे आताही नितीश विरोधी जनमताचा लाभ घेता आला नाही, तर त्यांना अथवा आघाडीला स्वबळावर सत्ता प्राप्त करता येणार नाही.
अशा स्थितीत निवडणुकीनंतर नितीशच भाजपवरील नाराजीतून पुन्हा एकदा महाआघाडीचे नेतृत्व करू शकतात किंवा चिराग आणि भाजप यांचेही सरकार येउ शकते अशा विविध शक्यता पडताळल्या जात आहेत. त्यातूनच बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्नची अर्थात भाजपला बाहेर घालवण्याच्या अंकाची पुनरावृत्ती होणार का याचा अदमास घेतला जातो आहे.