नवी दिल्ली – महाराष्ट्रातील निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असले तरी मुख्यमंत्रिपदासाठी अद्याप नाव निश्चित झालेले नाही. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना कालच महाराष्ट्राचे निरीक्षक बनवण्यात आले आणि अवघ्या २४ तासांत त्यांनी महाराष्ट्राबाबत मोठा दावा केला आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. भाजपचा मुख्यमंत्री झाल्यास मला काहीही अडचण नाही, असे विधान खुद्द एकनाथ शिंदे यांनीच केले होते. मला वाटतं यावेळी भाजपचाच मुख्यमंत्री होण्याची शक्यता अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले.
रुपाणी पुढे म्हणाले, उद्या सकाळी 11 वाजता विधीमंडळ पक्षाची बैठक आहे. तेथे चर्चेनंतर सर्वानुमते नेत्याची निवड करून त्याचे नाव हायकमांडला सांगितले जाईल, असे सांगून विजय रुपाणी म्हणाले की, हायकमांडने तिन्ही घटक पक्षांशी चर्चा केली आहे. सर्व काही एकमताने होईल. भाजपने सोमवारी संध्याकाळीच विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांना महाराष्ट्राचे निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे.
महाराष्ट्रात नव्या सरकारचा शपथविधी ५ डिसेंबरला होणार असल्याचे भाजपने आधीच जाहीर केले आहे. त्यासाठी मुंबईतील आझाद मैदानाची निवड करण्यात आली आहे. सारा पेच आता फक्त मुख्यमंत्री निवडण्यापुरता उरला आहे. 5 डिसेंबरला शपथ घेण्याचा दावा करणाऱ्या भाजपकडे आता फक्त उद्याचा दिवस उरला आहे. उद्याच मुंबईत महायुतीच्या आमदारांची बैठक होणार असून या बैठकीत राज्याच्या पुढील मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित होणार आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. शिवसेनेने अद्याप उपमुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित केले नसल्याची चर्चा आहे. अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काही मंत्रिपदांवर ठाम असल्याचीही चर्चा आहे.