नांदेड – करोना संसर्गामुळे राज्यात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. नवीन बाधितांसह करोनामुळे मृत्यू होण्याची संख्याही वाढत चालली आहे. अशाताच करोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच धक्का सहन न झाल्याने पत्नीने तीन वर्षाच्या चिमुकल्यासह तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लोहा येथे घडली आहे.
सविस्तर माहिती अशी की, मूळचे आंध्रप्रदेशचे रहिवासी असलेले शंकर गंदम हे गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसायानिमित्त लोहा शहरातील बालाजीनगर येथे पत्नी आणि तीन मुलांसह वास्तव्यास होते.
करोनाची लक्षणे जाणवत असल्याने शंकर गंदम यांनी अॅंटिजेन तपासणी केली. अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर त्यांना लोहा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पत्नी पद्मा गंदम यांनी आपल्या दोन मुलींना घरी ठेऊन तीन वर्षाच्या मुलासह तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे त्यांच्या दोन मुली अनाथ झाल्या आहेत. या प्रकरणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.