नागपूर – नागपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा विवस्त्र डान्सचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. 17 जानेवारी रोजी उमरेड तालुक्यातील ब्राह्मणी गावात घडलेल्या अशाच प्रकाराच्या घटनेचा पोलीस तपास सुरू असतानाच आता मौदा तालुक्यातील भूगावमध्ये तसाच प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवारी रात्री पोलिसांनी मौदा पोलीस स्थानकात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. तसेच या आयोजनातील इतरांचा पोलिस शोध घेत आहेत.
महाराष्ट्राची नृत्य परंपरा असलेल्या लावणीच्या नावाखाली भुगावमध्ये काहींनी “लावणी डान्स हंगामा” या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली मंचावर अक्षरशः ‘नंगा नाच’ आयोजित केला होता. हे पाहण्यासाठी शेकडो शौकीनही जमले होते. मंचावर नृत्याच्या नावाखाली स्त्री आणि पुरुष नर्तक अश्लील चाळे करत होते. पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, याआधी उमरेड तालुक्यातील ब्राह्मणी गावात 17 जानेवारीला असाच विवस्त्र डान्सचा प्रकार घडला होता. या प्रकरणाच्या तपासकामी नागपूर ग्रामीण पोलिसांनी महिला पोलीस उपअधीक्षकांच्या नेतृत्वात एक पथक तयार केले होते. आतापर्यंत एकूण 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ॲलेक्स उर्फ प्रबुद्ध बागडे या ऑर्केस्ट्रा संचालकाला ही अटक झाली असून तो अनेक पुरुष आणि महिला नर्तकांना घेऊन अनेक ठिकाणी “अलेक्स जुली के हंगामे” या नावाने रेकॉर्डिंग डान्सचे आयोजन करतो असे ही तपासात समोर आले आहे.