Marathi Education : राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य असताना काही ठिकाणी मराठी शिकवली जात नसल्याच्या तक्रारी समोर आल्याने राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. मराठी भाषा न शिकवणाऱ्या शाळा आणि संस्थांची मान्यता रद्द करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे. विधानसभेत यासंदर्भात माहिती देताना दादा भुसे म्हणाले की, ज्या माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही अशा तक्रारी प्राप्त झाल्यास तात्काळ चौकशी केली जाईल. चौकशीत संबंधित शाळेत मराठी शिकवली जात नसल्याचे आढळल्यास प्रथम त्या शाळेला सूचना दिल्या जातील. मात्र त्यानंतरही नियमांचे पालन न झाल्यास संबंधित शाळा आणि संस्थांची मान्यता रद्द करण्यात येईल. दरम्यान, मुंबई येथील काही इंटरनॅशनल शाळांमध्ये मराठी शिकवली जात नसल्याचा मुद्दा शिवसेना युबीटीचे आमदार हारूण खान यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर झालेल्या चर्चेदरम्यान शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे बंधनकारक असून याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.