1 हजार 59 महाविद्यालयांचे मूल्यांकनाचे काम पूर्ण
पुणे – महाराष्ट्र राज्यातील 1 हजार 177 वरिष्ठ अनुदानित महाविद्यालयांपैकी तब्बल 1 हजार 59 महाविद्यालयांचे “नॅक’ मूल्यांकन पूर्ण झाले आहे. “नॅक’ मूल्यांकन करून घेण्यात देशात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे.
केंद्रातील विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशानुसार महाविद्यालयांनी राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) मानांकन प्राप्त करून घेणे बंधनकारक आहे. शासनाचे अनुदान मिळविणे, नवीन तुकडी व शाखांना मान्यता घेणे, विविध प्रकल्पांसाठी अनुदान मिळविणे, स्वायत्तता प्राप्त करून घेणे आदींसह इतर काही महत्त्वाच्या बाबींसाठी “नॅक’ मूल्यांकन असण्याची अट घातली आहे. “नॅक’ मूल्यांकनाच्या नियमावलीत व कार्यपद्धतीत काही महत्त्वाच्या सुधारणाही केल्या आहेत. महाविद्यालयांना ऑनलाइन प्रस्ताव दाखल करावे लागतात. त्यात आवश्यक ती माहिती नमूद करावी लागते. त्यात प्रश्नांची उत्तरेही भरून द्यावी लागत आहेत.
“नॅक’ मूल्यांकनासाठी तज्ज्ञांच्या समित्याही गठीत करण्यात येतात. विविध राज्यांमधील महाविद्यालयांना तज्ज्ञ भेटी देतात. संशोधनाची गुणवत्ता, अध्यापनाचा दर्जा, शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षणाचा दृष्टीकोन, विद्यार्थ्यांकडून मिळणारा प्रतिसाद यांचा विचार करून महाविद्यालयांना मानांकन जाहीर करण्यात येते. राज्यात 28 शासकीय महाविद्यालये आहेत. यातील 23 महाविद्यालयांचे “नॅक’ मूल्यांकन झाले आहे. अद्यापही 118 अनुदानित महाविद्यालयांनी एकदाही “नॅक’ मूल्यांकन करून घेतलेले नाही.
महाविद्यालयांनी “नॅक’ मूल्यांकन करून घ्यावे यासाठी उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी अनेकदा महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत. महाविद्यालयांसाठी ठिकठिकाणी मार्गदर्शनपर कार्यशाळा घेऊन त्यांचे समुपदेशनही करण्यात येत असते. पूर्वी “नॅक’ झालेल्या महाविद्यालयांकडून इतर महाविद्यालयांना सहकार्य करण्याची भूमिका ठेवण्यात येत असते. त्यामुळे पूर्वी उदासीनता दाखविणाऱ्या महाविद्यालयांनी प्रोत्साहन मिळाल्यामुळे “नॅक’ मूल्यांकन करून घेण्याला बहुसंख्य महाविद्यालयांनी प्राधान्य दिले आहे. यामुळे संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचे आढळून येत आहे.