fbpx

पाकिस्तानी माऱ्यात महाराष्ट्रातील सुपुत्राला वीरमरण

एलओसी लगतच्या शस्त्रसंधी उल्लंघनात आणखी एक जवान जखमी

जम्मू – पाकिस्तानी सैनिकांनी शनिवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून जम्मू-काश्‍मीरमधील दोन क्षेत्रांत मारा केला. त्यातील एका घटनेत भारतीय लष्कराचा हवालदार शहीद झाला, तर आणखी एक जवान जखमी झाला. वीरमरण आलेला हवालदार महाराष्ट्राचा सुपुत्र आहे.

पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत असणाऱ्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा क्षेत्रात गोळीबार केला. त्यांनी भारतीय सीमा नाक्‍यांबरोबरच गावांना लक्ष्य केले. त्या माऱ्यात दोन जवान जखमी झाले. त्यातील हवालदार संग्राम शिवाजी पाटील यांचे निधन झाले. ते महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी होते.

पाकिस्तानी सैनिकांनी आंतरराष्ट्रीय सीमेच्या (आयबी) लगत असणाऱ्या कठुआ जिल्ह्यातील हिरानगर क्षेत्रातही मारा केला. पाकिस्तानी सैनिकांनी दोन्ही ठिकाणी केलेल्या आगळिकींना भारतीय जवानांनी जबर प्रत्युत्तर दिले.

याआधी पाकिस्तानी जवानांनी आठवडाभरापूर्वी एलओसी लगतच्या उत्तर काश्‍मीरमधील भागांत अक्षरश: थैमान घातले होते. त्यांनी केलेल्या माऱ्यात 11 जण मृत्युमुखी पडले. त्यामध्ये 5 शहीद जवानांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.