पुणे :- मानाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा धाराशीवमध्ये होणार आहे. स्पर्धेचे यंदा 65 वे वर्ष असून ही स्पर्धा येत्या 1 ते 5 नोव्हेंबर या कालावधीत होणार असल्याची माहिती महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेने दिली आहे.
धाराशिव जिल्हा कुस्ती तालीम संघ आणि आदर्श शिक्षक प्रसारक मंडळ या स्पर्धेचं आयोजन करणार आहेत. जवळपास 900 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार 5 दिवस चालणार आहे. या स्पर्धेत 45 वेगवेगळे जिल्हा संघ सहभागी होणार आहेत. त्यातून 450 खेळाडू माती आणि 450 खेळाडू गादी गटात असे 900 खेळाडू सहभागी होतील.माती आणि गादी असे 20 वेगवेगळ्या वजनी गटात ही स्पर्धा होणार आहे.
विजेत्या कुस्तीपटूंना स्कॉर्पियो कार व ट्रॅक्टरसह तब्बल 2 कोटीं रुपयांचे पारितोषिक दिले जाणार असून 18 बुलेट मोटारसायकलही विविध गटातील विजेत्यांना दिल्या जाणार आहेत.
दरम्यान, मागील वर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा खिताब पृथ्वीराज पाटीलने जिंकला होता. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने विशाल बनकरला आसमान दाखवत विजेतेपद पटकावले होते.