स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी – महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती गटात गत महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख याला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. जालन्याच्या शेखवर वाशीमच्या सिकंदर शेखने मात केली. खरेतर हा सामना रफिक जिंकेल, असे वाटले होते. मात्र, प्रत्यक्षात सिकंदरने चक्क रफिकला चितपट केले व स्पर्धेच्या विजेतेपदाची आशा कायम राखली.
Maharashtra kesari 2023: ‘हे’ पैलवान फायनलच्या शर्यतीत, कोण मारणार बाजी?
या विजयासह सिकंदरने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याच्यासह महेंद्र गायकवाडनेही उपांत्य फेरी गाठली आहे. माती विभागातून महेंद्र व सिकंदर यांच्यात लढत होऊन विजेता मल्ल अंतिम फेरीत प्रवेश करेल. गादी विभागात हर्षवर्धन सदगीर व शिवराज राक्षे यांनी उपांत्य फेरी गाठली असून त्यांच्यातील विजेता अंतिम फेरीत प्रवेश करेल. त्यामुळे आता हे चारही मल्ल मानाच्या महाराष्ट्र केसरी किताबाचे दावेदार बनले आहेत.
माती विभागाच्या उपांत्यपूर्व फेरीत माजी उपमहाराष्ट्र केसरी असणाऱ्या लातूरच्या शैलेश शेळकेला सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने 5-2 असे पराभूत करताना उपांत्य फेरी गाठली. वाशीमच्या सिकंदर शेखने मुंबईच्या विशाल बनकरला 10-0 असे एकतर्फी पराभूत करताना उपांत्य फेरी गाठली. सिकंदरने भारंदाज डाव टाकताना थेट चार गुणांची कमाई करताना आपली बढत 8-0 अशी वाढवली. दुसऱ्या डावात सिकंदरने तांत्रिक 2 गुण मिळवत विजय साकारला.
मोठी बातमी! भारताची टेनिस खेळाडू सानिया मिर्झा घेणार निवृत्ती; पोस्ट शेअर करत दिली माहिती
जालन्याचा माजी महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखने आपल्या नावाला साजेसा खेळ करताना कोल्हापूरच्या अरुण बोंगार्डेला 7-0 असे पराभूत करताना उपांत्य फेरीत दिमाखदार प्रवेश केला. रफिकने पहिल्याच प्रयत्नात कटऑफ करताना 2 गुण कमावले. त्यानंतर बाला रफिकने भारंदाज डाव टाकत पुन्हा 2 गुण मिळविले. यानंतर बाला रफिक शेखने संयमी कुस्ती करताना पुन्हा एकदा अरुण बोंगार्डेचा ताबा घेताना 2 गुण मिळविले. पहिल्याच फेरीत बाला रफिक शेखने 6-0 अशी आघाडी मिळविली होती. बाला रफिकने तांत्रिक एक गुण मिळविताना 7-0 असे मैदान मारले.
गादी विभागातून नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने वाशीमच्या वैभव मानेला 5-0 असे पराभूत करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. याच विभागातून पुण्याच्या तुषार डुबेने सोलापूरच्या अक्षय मंगवडेला 2-0 असे पराभूत करताना उपांत्य फेरी गाठली. तिसऱ्या लढतीत हिंगोलीच्या गणेश जगतापने सांगलीच्या सुबोध पाटीलला 5-0 असे पराभूत करताना उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. चौथ्या लढतीत शिवराज राक्षेने माऊली कोकाटेला 10 -0 असे एकतर्फी पराभूत करताना महाराष्ट्र केसरी गटाच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला.