पुणे – संपूर्ण देशभरातील कुस्तीपटूंसाठी अत्यंत मानाची समजली जात असलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा साताऱ्यात येत्या 5 ते 9 एप्रिल दरम्यान रंगणार आहे, असे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने जाहीर केले आहे.
5 एप्रिल रोजी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा होणार आहे. कोरोनाच्या धोक्यामुळे गेली दोन वर्षे ही स्पर्धा झाली नव्हती. त्यामुळे यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची उत्सूकता वाढली आहे.
या स्पर्धेचे सर्व सामने येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूलात खेळवण्यात येणार आहेत.
ऑलिंपिक स्पर्धेत देशाला पहिले कास्य पदक मिळवून देणाऱ्या ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या जन्मभूमीत प्रतिष्ठेची गदा उंचवण्यासाठी मल्ल सज्ज बनले आहेत. कै.मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रात राज्य कुस्तीगीर परिषदेची बैठक नुकतीच पार पडली. त्यात 64 वी वरिष्ठ गट गादी आणि माती या प्रकारातील राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसह महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 5 ते 9 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्याचे जाहिर झाले.