- करोनामुळे प्रेक्षकांविनाच मंगळवारी कुस्त्यांचा आखाडा
पिंपरी- कै. वस्ताद बाळासाहेब विठोबा गावडे प्रतिष्ठान आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धा मंगळवारी (दि.23) होणार आहेत. ह्या स्पर्धा करोना प्रादुर्भावामुळे प्रेक्षकांशिवाय होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हणुमंत गावडे व पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या निवड चाचणी कुस्ती स्पर्धेसाठी स्पर्धकांनी मंगळवारी (दि.23) सकाळी 9 वाजता वजन तपासणीसाठी उपस्थित रहावे. येताना आधार कार्ड व रहिवाशी पुरावा ही कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धा दुपारी 3 वाजता रहाटणी येथील थोपटे लॉन्समध्ये होणार आहेत. स्पर्धत पैलवानांसोबत एक पालक उपस्थित राहू शकतील. यावेळी फक्त वरिष्ठ गटातील माती व गादी विभागातील स्पर्धा होतील. कुमार गटांतील स्पर्धेविषयी नंतर माहिती देण्यात येईल.
वरिष्ठ गटासाठी माती व गादी विभागातील वजन गट 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 आणि 86 ते 125 (महाराष्ट्र केसरी गट) या प्रमाणे असतील. वस्ताद, मार्गदर्शक, पालक आणि स्पर्धकांनी वेळेत उपस्थित रहावे तसेच करोना विषयी सांगितलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.