राजेश टोपे ः करोनासाठीच्या रुग्णालयाचे तीन भागात वर्गीकरण
मुंबई : देशात महाराष्ट्राने सर्वाधिक करोनाच्या चाचणी केली असल्याने राज्य अनेक रुग्ण आढळले आहेत. यातील दिलासाची बाब म्हणजे, 70 टक्के पॉझिटिव्ह रुग्ण यांची प्रकृती उत्तम असून 5 टक्के रुग्णांची अवस्था ही थोडी चिंताजनक आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन असे झोन तयार केले जाणार आहेत, असेही संकेत त्यांनी दिले.
देशात महाराष्ट्रात सर्वाधिक करोना व्हायरसच्या 33 हजार चाचण्या करण्यात आल्या. यातील एकट्या मुंबईत 19 हजार टेस्ट करण्यात आल्या आहेत. यातील एकूण चाचण्यांपैकी 1652 जणांचे नमुने करोना पॉझिटिव्ह मिळाले, अशी माहिती त्यांनी दिली. राजेश टोपे म्हणाले, कोव्हिड केअर सेंटर यामध्ये ज्यांना लक्षणे दिसत नाहीत मात्र जे पॉझिटिव्ह आहेत असे रुग्ण असतील. दुसऱ्या प्रकारच्या रुग्णालयात ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना ठेवले जाईल. तर लक्षणं नसणाऱ्या रुग्णांची सोय ही माईल्ड प्रकारच्या रुग्णालयांमध्ये केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. आरोग्य सेतू हे सगळ्यांनी डाऊनलोड करावे, अशी आग्रही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत घेतली असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. शेतीविषयक कामे आजही होऊ शकते. ग्रीन झोनसंदर्भातले निर्देश समोर आले तर लॉक इनमध्ये राहून काही भाग सुरु करता येतील का यावर विचार विनीमय सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले.
तीन जिल्हे वगळता राज्यात नऊ टक्के रुग्ण
राज्यातील एकूण रुग्णांपैकी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये मिळून 91 टक्के रुग्ण आहेत. एकट्या मुंबईत सर्वाधिक 61 टक्के रुग्ण आहेत. पुण्यात 20 टक्के आणि पालघर जिल्ह्यात 10 टक्के रुग्ण आहेत. हे तीन जिल्हे वगळता उर्वरित नऊ टक्के रुग्ण संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबईत सेव्हन हिल्स हॉस्पिटल्समध्ये कोविड 19 साठी तीनशे बेडस सज्ज आहेत. तिन्ही प्रकारच्या रुग्णांना इथे ठेवता येऊ शकते, असे टोपे म्हणाले.