मुंबई – वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी वर्णी लागली आहे. सुबोधकुमार जैस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी प्रतिनियुक्ती झाल्यानंतर हे पद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर हेमंत नगराळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
हेमंत नगराळे हे 1987च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांचा 19 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. हेमंत नगराळे यांनी 2016 मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला होता. त्यानंतर 2018 मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. नगराळे सध्या पोलिस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून कार्यरत आहेत.
हेमंत नगराळे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना देशभर गाजलेल्या वाशीतील बॅंक ऑफ बडोदा दरोड्याची उकल अवघ्या दोन दिवसात केल्याने त्यांचे कौतुक झाले होते. 17 वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा, पॉप गायक जस्टीन बिबरच्या कार्यक्रमात चांगली कायदा-व्यवस्था ठेवल्याने त्यांना शाबासकीची थाप मिळाली होती. त्यांच्या काळात झालेली पोलीस क्रीडा स्पर्धाही राज्यात गाजली. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फी, बदली करण्यातही ते अग्रेसर होते.
दरम्यान, संजय पांडे, हेमंत नगराळे, सुरेंद्र कुमार पांडे आणि रजनीश सेठ यांची नावे पोलीस महासंचालकपदासाठी चर्चेत होती. परंतु नगराळे यांचे पारडे आधीपासूनच जड मानले जात होते.