Weather Update 2026 : संपूर्ण महाराष्ट्र सध्या भीषण उष्णतेच्या विळख्यात सापडला असून, राज्याच्या तापमानाचा पारा सातत्याने चढत आहे. विदर्भातील अकोला शहरात आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून, येत्या १७ एप्रिल रोजी एप्रिल महिन्यातील सर्वात उष्ण दिवसाचा अनुभव येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्याच्या निम्म्या भागात उष्णतेची लाट येणार असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Weather Update 2026) हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस तापमानामध्ये १ ते २ अंशांनी वाढ होणार आहे. कर्नाटक व लगतच्या महाराष्ट्रात उच्च दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे हवा खाली दाबली जात असल्याने ती गरम होत आहे. (Weather Update 2026) यामुळे जमिनीलगतची उष्णता वातावरणात वर जाऊ शकत नसल्याने तापमान वाढत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स कमकुवत झाले आहे. त्यामुळे त्यांचा प्रभाव ओसरला असून आभाळ निरभ्र झाले आहे. त्यामुळे सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडून तापमान वाढत आहे, असे हवामानतज्ज्ञांनी सांगितले. अकोल्याचे तापमान ४८ तासांत ४५ अंशांचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रावरून येणा-या बाष्पयुक्त वा-यांचे प्रमाण घटले असून कोरड्या हवामानामुळे तापमानात वाढ होत आहे. अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, बुलडाणा जिल्ह्यात २० तारखेपर्यंत तापमानाचा पारा सतत वाढत जाण्याची शक्यता आहे. (Weather Update 2026)