देशातील सर्वाधिक पाऊस महाराष्ट्रात

पुणे – देशात पावसाळा सुरू होऊन अडीच महिने होत आहेत. या काळात राज्यनिहाय पावसाचा आढावा घेतला असता,यंदा महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडल्याचे निष्पन्न झाले आहे. हवामान खात्याने नुकतेच देशभरातील पावसाची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

भारतीय हवामान खात्याने 1 जून ते 12 ऑगस्टदरम्यानचा विविध राज्यांत आतापर्यंतच्या पावसाची सरासरी नुकतीच प्रसिद्ध केली. दरवर्षी महाराष्ट्रात साधारणतः पहिल्या अडीच महिन्यांत 667.2 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा तो 883.9 मिलिमीटर झाला आहे.त्याखालोखाल गुजरात, कर्नाटक आणि सिक्कीम येथे चांगला पाऊस झाला आहे.

महाराष्ट्रात यंदा सरासरीच्या सुमारे 32 टक्के अधिक पाऊस पडला आहे. 883.9 मिलीमीटर पाऊस हा अवघ्या 72 दिवसांत पडला आहे. पावसाळ्याचा दीड महिना अजून बाकी आहे. त्यामुळे ही सरासरी आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. राज्यात सर्वाधिक पाऊस पडला असला, तरी त्यात सलगता नाही. कारण मराठवाडा अद्यापही कोरडा आहे. विदर्भातील काही भाग वगळता अन्य ठिकाणी पाऊस सरासरीपेक्षा कमीच आहे. पाश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्रात पाऊस जास्त झाला आहे. तो ऐवढा जास्त झाला आहे, की त्यामुळे राज्याची सरासरी भरुन काढली आहे.

दुसऱ्या बाजूला देशातील आठ राज्यांनी अद्याप पावसाची सरासरीसुद्धा गाठलेली नाही. त्यात झारखंड, पाश्‍चिम बंगाल, हरियाणा, हिमाचल प्रदेश, नागलॅंड या प्रमुख राज्यांचा समावेश आहे. देशातील 21 राज्यांमध्ये यंदा सरासरीऐवढा पाऊस पडला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here