Lock Down | “कोणाचीही रोजी-रोटी जाईल असा निर्णय राज्य सरकार घेणार नाही”

नागपूर – राज्यात लॉकडाऊनच्या चर्चा सुरू झाल्या असताना नागपूरमध्ये राज्य सराकारचे प्रोटोकॉल लागू राहतील. राज्य सरकारने सांगितलेले नियम येथे लागू नसतील, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली. तसेच, कोणाचीही रोजी-रोटी जाईल असा निर्णय राज्य सरकार घेणार नाही, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी यावेळी जनतेला दिली. एका वाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

नागपुरात करोना रुग्णांमध्ये रोज हजारोंच्या संख्येने वाढ होत आहे. तसेच येथे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आकडासुद्धा मोठा आहे. या पार्श्वभूमीवर नितीन राऊत यांनी नागपुरातील कोरोना परिस्थितीविषयी महत्त्वाची माहिती दिली. नागपुरात कोणत्याही नियमांत बदल करण्यात येणार नाही. त्यामुळे करोनाला थोपवण्यात मदत होईल, असे राऊत म्हणाले.

करोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊन लागू केल्यानंतर राज्यात लाखो स्थलांतरीत मजुरांचा प्रश्न निर्माण झाला होता. रोजगारापासून ते प्रवासापर्यंतच्या अनेक अडचणींना मजुरांना सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आता पुन्हा लॉकडाऊनचे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. याविषयी बोलताना कोणाचीही रोजी-रोटी जाईल असा निर्णय राज्य सरकार घेणार नाही, असे राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं.

ग्रामीण भागातसुद्धा बेडची व्यवस्था करणार

नागपुरात रुग्ण वाढत असल्यामुळे येथे बेड्‌सची कमतरता भासत आहे. तशी तक्रार मागील अनेक दिवसांपासून केली जात आहे. याविषयी बोलताना मागील अनेक दिवसांपासून बेड संदर्भात तक्रारी येत आहेत. प्रत्यक्ष रुग्णालयांत जाऊन मी त्याची माहिती घेणार आहे. बेडची व्यवस्था करण्यासाठी विशेष अधिकारी नेमण्यात आले आहेत. तसेच ग्रामीण भागात बेड्‌सची कमतरता भासत असेल तर तेथेसुद्धा खाटा पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे राऊत म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.