मुंबई – शाहिर साबळे यांच्या आवाजातील “जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला महाराष्ट्राच्या राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्राच्या इतिहास आणि संस्कृतीचे दर्शन घडवून देणाऱ्या राजा बडे लिखित या गाण्याला शाहिर साबळे यांचा भारदस्त आवाज लाभलेला आहे. शाहिर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित “महाराष्ट्र शाहिर’ हा सिनेमा येत्या 28 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. त्याआधीच त्यांच्या गीताला राज्यगीताचा दर्जा मिळाला आहे.
या निर्णयामुळे महाराष्ट्राला अधिकृत राज्यगीत मिळाले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारी 2023ला या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात प्रत्येक राज्याचे एक गीत असावे असे ठरले आहे. त्यानुसार महाराष्ट्र गीतासाठी एकूण 3 गीतांची निवड करण्यात आली होती. त्यात “जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताची निवड झाली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय
– सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्ती योजना अभिमत विद्यापीठांकरीता लागू.
– सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली 12 नवीन समाजकार्य महाविद्यालयांची स्थापना होणार.
– सन 2022 च्या तेंदू हंगामापासून तेंदूपाने स्वामित्व शुल्काची रक्कम संकलन करणाऱ्या मजुरांना मजुरी म्हणून देणार.
– स्पर्धा परीक्षा टी.सी.एस. आयओएन व आय.बी.पी.एस. या कंपन्यांकडून घेताना उमेदवारांसाठीचे परीक्षा शुल्क निश्चित.
– फलटण-पंढरपूर या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गाकरिता राज्य शासनाचा आर्थिक सहभाग
– बालसंगोपन योजनेंतील परिपोषण अनुदानात 1हजार 225 वरुन 2500 रुपये इतकी वाढ
– पुण्यातील निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पास 3976 कोटी 83 लाख रुपयांची तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता.
– पुरंदर उपसा सिंचन योजनेस 460 कोटी रुपयांची पहिली सुधारित मान्यता.
– महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय.