New Voter ID : राज्यातील मतदार नोंदणी प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली असून, आता नवीन मतदारांना नोंदणी मंजूर झाल्यापासून अवघ्या १५ दिवसांत त्यांचे ओळखपत्र प्राप्त होणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी रविवारी नाशिकमध्ये आयोजित राज्यस्तरीय राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमात ही घोषणा केली. कार्यक्रमाला संबोधित करताना एस. चोकलिंगम यांनी मान्य केले की, गेल्या दीड वर्षांत मतदार यादीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. लोकशाहीचा कणा हा विश्वास असतो आणि हा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी मतदार यादी पूर्णपणे दोषमुक्त करणे हे आमचे प्राथमिक लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी मतदार ओळखपत्र मिळवण्यासाठी साधारण ५० दिवसांचा कालावधी लागत असे, मात्र नवीन तंत्रज्ञानामुळे हा कालावधी आता मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. New Voter ID Card 15 Days Maharashtra मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या उपाययोजनांवर प्रकाश टाकताना चोकलिंगम म्हणाले की, सध्या एकाच व्यक्तीचे दोन फोटो किंवा अपात्र मतदारांची नावे शोधण्याचे काम मतदारसंघ पातळीवर सुरू आहे, जे लवकरच राज्य पातळीवर नेले जाईल. भविष्यात आपल्याला अशी व्यवस्था निर्माण करायची आहे जिथे वयाची १८ वर्षे पूर्ण होताच नाव आपोआप नोंदवले जाईल आणि मृत्यूनंतर ते आपोआप वगळले जाईल. २०२९ च्या निवडणुकांपर्यंत एकही त्रुटी नसलेली आणि संशयातीत मतदार यादी तयार करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. याच कार्यक्रमात उप-मुख्य निवडणूक अधिकारी सुनील सोनार यांनी माहिती दिली की, महाराष्ट्रातील ९.९३ कोटी मतदारांसाठी लवकरच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे. हे ही वाचा : Voter List : मतदार याद्यांमधील घोळ तपासणार; मुख्य निवडणूक अधिका-यांकडून चौकशीचे आदेश