#महाराष्ट्रदिन : मुख्य शासकीय कार्यक्रमात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित छत्रपती शाहु स्टेडियम येथे आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महापौर सरिता मोरे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महानगरपालिका आयुक्त मलिन्नाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे , निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.

कृषि राज्यमंत्री संदभाऊ खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र वर्धापन दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्राचे योगदान अतुलनीय असल्याचे सांगून महाराष्ट्र राज्याकडे देशाची आर्थिक राजधानी म्हणून पाहिले जाते, विविध परंपरा, संस्कृती, कला यांचा प्रदिर्घ आणि समृध्द वारसा लाभलेला महाराष्ट्र संपूर्ण देशात विविध क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे, ही बाब सर्व महाराष्ट्रवासियांसाठी अभिमानाची आहे. विविध लेणी, गडकोड किल्ले, समुद्र किनारे, जैवसंपदा यांनी नटलेला महाराष्ट्र विकासाचे नवनवीन मानदंड निमार्ण करत आहे. विविध आवाहनाना सामोरे जात असताना नियोजनबध्द रितीने समस्यांची सोडवणूक करत आहे. प्रगतीची आस असलेला महाराष्ट्र सतत प्रगतीची उंच उंच शिखरे गाठत राहो अशा शब्दात कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमामध्ये परेड संचलन करण्यात आले. परेड संचलनात सशस्त्र पोलीस पथक, पोलीस दल, वनरक्षक दल, बँड पथक, श्वान पथक, वज्र वाहन, दंगल नियंत्रण पथक, सीसीसटीव्ही सर्व्हेलन्स व्हॅन, मोबाईल फॉरेसिक लॅब पथक, महात्मा गांधी तंटामुक्त अभियान, अग्नीशमन पथक, निर्भया पथक, अशा विविध विभागांची पथके सहभागी झाली होती. याबरोबरच शालेय मुला-मुलींनी समुहगान सादर केले.

कार्यक्रमास राजर्षि छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे, जिल्हा शल्य चिकित्स्क डॉ. बी. सी. केम्पी-पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, कार्यकारी अभियंता श्री. सोनवणे, कृषि विभागाचे ज्ञानदेव वाकुरे, उमेश पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.