नवी दिल्ली/मुंबई : दिल्ली पोलिस आयुक्त अमुल्य पटनाईक हे शुक्रवारी (दि. 31) निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी माहाराष्ट्राचे पोलिस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाला गृहमंत्रालयाने जैस्वाल यांचे नाव चार जानेवारीलाच कळवले असल्याची माहिती हाती येत आहे.
जानेवारी महिन्याच्या अखेरीस पटनायक हे निवृत्त होत असून त्यांच्या जागी जैस्वाल यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे या पत्रात नमूद केले आहे. जैस्वाल हे 1985 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. मात्र जैस्वाल यांच्या नावावरून मतभिन्नता झाल्यास गृहमंत्रालय एक समिती स्थापन करून त्याद्वारे दिल्लीचे आयुक्त निवडेल, असेही या पत्रात स्पष्ट केले आहे.
मात्र पत्रात उल्लेख केलेल्या समितीची सर्वोच्च न्यायलयाच्या निर्देशानुसार गरज नसल्याचे सांगण्यात येत आहे. अशी समिती केवळ पोलिस महासंचालकांच्या जागेसाठी करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायलयाने केली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे जैस्वाल यांची नियुक्ती नक्की असल्याचे सुत्रांनी सांगितले.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उत्तीर्ण झालेला आणि सेवा जेष्ठता असणाऱ्या तसेच उत्तम कातकिर्द असणाऱ्या अधिकाऱ्याची तीन जणांमधून पोलिस महासंचालकपदी निवड करण्यात येते. जैस्वाल यांची महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदी भाजप सरकारच्या काळात गेल्या वर्षी फेब्रुवारीत निवड करण्यात आली होती. त्या पुर्वी ते मुंबईचे पोलिस आयुक्त होते.