पुणे – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. एखादी गोष्ट खटकली तर ती समोरासमोर बोलून दाखवायची अशी त्यांची कार्यपद्धती आहे. त्यांच्या याच स्वभावाचा परिचय पुन्हा एकदा आला आहे. निमित्त होते पुण्यातील कृषी महाविद्यालय येथे गोधन 2022 देशी गोवंश प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन.
अजित पवार यांनी नुकतेच पुण्यातील कृषी महाविद्यालय येथे गोधन 2022 देशी गोवंश प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन करून तिथल्या कामाची पाहणी केली. त्यावेळी कामात त्यांना काही त्रुटी आढळल्या. त्यामुळं ते नाराज झाले. कार्यक्रमाच्या ठिकाणी येताच ते तडक एका गोठ्याजवळ गेले. तेथील आतील जमीनीचा स्तर समांतर नव्हता. अनेक ठिकाणचे बांबू तुटलेले होते. ते पाहून उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. याआधी पुण्यातच शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या नुतनीकरणीकृत इमारतीच्या उद्घाटनावेळी त्यांनी तेथील कामाची पाहणी केली असता त्यांना तृटी आढळून आल्या होत्या. त्यावेळी पवार यांनी कंत्राटदाराला चांगलचं सुनावलं होतं. आमच्या भाषेत सांगायचं तर तुम्ही अगदी छा-छू काम केलं आहे असे पवार म्हणाले होते.
असाच काहीसा प्रसंग आज पुन्हा एकदा कृषी महाविद्यालय येथे गोधन 2022 देशी गोवंश प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे उद्घाटनावेळी समोर आला आहे. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. ते म्हणाले, आरे काय केलंय, तुम्ही मला सांगा एवढं लागत (निधी) आहे, पुरवण्या मागण्यांमध्ये करून देतो. तुम्ही अधिकार्यांनी मला बोलवताना दहावेळा विचार करा. मी तुमचा पंचनामा करेन की कौतुक करेन. माझा काटेवाडीचा आणि बारामतीचादेखील गोठा येऊन पहा. आवड पाहिजे, आवड असल्याशिवाय काही होत नाही.