यवतमाळ : बदलापूर प्रकरणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. विकृत माणसाचा कायमचा बंदोबस्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही अजित पवार यांनी यवतमाळ मधील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात दिली. तसेच हि केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणीदेखील अजित पवारांनी यावेळी केली.
नेमके काय म्हणाले अजित पवार?
‘जो चुकीचं वागेल त्याला शासन झालंच पाहिजे, तो कितीही मोठ्या बापाचा असूद्या किंवा कितीही मोठ्या वशिल्याचा असू द्या, त्याची फिकिर आम्ही करणार नाही. त्याला इतकं कडक शासन करणार, आमचा तर प्रयत्न सुरु आहे शक्ती कायदा दिल्लीत राष्ट्रपतींकडे गेला आहे, तो लवकर मंजूर करुन आणायचा आहे.
माझ्या तर मनात वैयक्तिक आहे, अशा प्रकारची विकृत माणसं, ज्यावेळेस आमच्या आई-बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात, त्यावेळेस त्यांना पुन्हा अशा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे, की पुन्हा तसा विचारही त्यांच्या मनात येता कामा नये’.
हेच जर ‘माझ्या भाषेत सांगायचं तर त्यांचं सामानच काढून टाकलं पाहिजे. हे केलंच पाहिजे इतके नालायक काही काही लोकं आहेत, जो चुकीचं वागेल त्याला शासन झालंच पाहिजे’ असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
काय आहे बदलापूर प्रकरण ?
बदलापूर पूर्वेतील आदर्श विद्यालय या शाळेमध्ये एका चार वर्षांच्या आणि एका सहा वर्षांच्या मुलीवर शाळेतील शिपायाकडून अत्याचार करण्यात आला. लघुशंकेला घेऊन जाऊन या मुलींवर अत्याचार करण्यात आला. १२ ऑगस्ट रोजी एका मुलीसोबत दुष्कृत्य केले गेले, तर १३ ऑगस्टला आणखी एका दुसऱ्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला.
या मुली शाळेत जायला तयार नसल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, त्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला.दोन्ही पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी १६ ऑगस्ट रोजी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी १२ तासांचा विलंब केल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी अक्षय शिंदे नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी बदलापूर स्थानक बंद ठेवत आंदोलन केले. तसेच आंदोलकांकडून आरोपीला फाशी द्या, नाहीतर आरोपीला आमच्या हवाली करा अशी मागणी करण्यात आली.