पुणे – महाराष्ट्र क्रिकेट प्रिमियर लीग 2019 एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत दिव्यांग हिंगणेकरने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर हेमंत पाटील क्रिकेट अकादमी अ संघाने केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा 2 गडी राखून पराभव करत स्पर्धेचे
विजेतेपद पटकावले
अंतिम फेरीच्या लढतीत हेमंत पाटील क्रिकेट अकादमी अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना केडन्स क्रिकेट अकादमी संघाने 39.1 षटकांत 251धावांचे आव्हान उभे केले. यात सुरुवातीला अथर्व काळेने 54 चेंडूत 5 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 66 धावा व निखिल पराडकर 24 धावा केल्या. त्यानंतर सामन्यात फलंदाजीस आलेल्या आकाश कारगवेने 58धावा, गणेश गायकवाडने 46धावा हर्षद खडीवालेने 20धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. हेमंत पाटील क्रिकेट अकादमीकडून आकाश जाधव(4-54), हितेश वाळुंज(3-49), शुभम कोठारी (2-48) यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत केडन्स संघाला 251धावांवर रोखले.
याच्या उत्तरात हेमंत पाटील क्रिकेट अकादमी अ संघाने 39.5 षटकात 8 गड्यांच्या बदल्यात 252 धावा करून हे आव्हान पूर्ण केले. सामन्यात वरच्या फळीच्या फलंदाजांना मोठी खेळी करण्यास अपयश आले. 13.2 षटकात 5 बाद 54 अशी संघाची धावसंख्या असताना सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास आलेल्या दिव्यांग हिंगणेकरने आक्रमक खेळी केली. दिव्यांग याने अफलातून फलंदाजी करताना 83 चेंडूत 10 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 120 धावांची शतकी खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दिव्यांगला अविनाश शिंदेने 24 धावा काढून सुरेख साथ दिली.
दिव्यांग हिंगणेकर व अविनाश शिंदे यांनी सहाव्या गडयासाठी 57 चेंडूत 50 धावांची भागीदारी केली. अविनाश शिंदे बाद झाल्यावर दिव्यांगने आकाश जाधव (25 धावा) याच्या साथीत आठव्या गडयासाठी 43 चेंडूत 52 धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. त्यानंतर शुभम कोठारी (नाबाद 17 धावा) व दिव्यांग हिंगणेकर यांनी नवव्या गडयासाठी 27 चेंडूत 50 धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला.