लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या जागा २३ वरून थेट ९ वर आल्या. देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचं सरकार स्थापन झालं खरं मात्र राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भाजपची बिकट अवस्था त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी होती. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट, त्यात देवेंद्र फडणवीसांच्या सहभागाचे नॅरेटिव्ह, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे वैयक्तिक आरोप, लोकसभेतील पीछेहाट – अशा चक्रव्युव्हात देवेंद्र फडणवीस अडकले.
त्यात भर म्हणजे राज्यात अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुका! देवेंद्र फडणवीस या चक्रव्यूहातून कसे बाहेर पडणार याची चर्चा सर्वत्र होत होती. मात्र स्वतः देवेंद्र फडणवीसांनी आपण आधुनिक अभिमन्यू असल्याचे सांगत – हे चक्रव्यूव्ह भेदून दाखवले असून पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर मुसंडी मारली आहे.