Maharashtra CM – विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या ऐतिहासिक विजयानंतर महायुती सरकारचा शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. हा सोहळा अत्यंत भव्य दिव्य स्वरूपाचा असणार आहे. येत्या गुरुवारी म्हणजेच 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील आझाद मैदानात हा सोहळा रंगणार आहे. तसेच शपथविधीच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी तयारीची पाहणी केली.
येत्या 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात महायुती सरकारचा महा शपथविधी सोहळ्याची तयारी सुरु आहे. चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दरेकर यांनी आज आझाद मैदानावर सुरु असलेल्या तयारीची पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही उपस्थित होते. मात्र एकनाथ शिंदेसेनेचा एकही आमदार त्यांच्यासोबत नव्हता. त्यामुळे शिंदेसेनेच्या नाराजीची पुन्हा एकदा चर्चा झाली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे विधान परिषदेतील आमदार प्रवीण दरेकर यांनी शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तसेच, लाडक्या बहिणींना विशेष आमंत्रण देण्यात येणार आहे. यावेळी मुख्य मंचावर शपथविधी, दुसऱ्या मंचावर साधू-महंत तर तिसऱ्या मंचावर संगीत असा भव्य कार्यक्रम असणार आहे.
मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार, भाजप गटनेत्याची निवड केव्हा होणार, या प्रश्नांवर लवकरच होईल, एवढ्या त्रोटक शब्दात त्यांनी उत्तर दिले. एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांचे वृत्त बावनकुळे यांनी फेटाळले. मात्र शिंदेसेनेचा एकही आमदार आझाद मैदानाच्या पाहणीसाठी का नाही, या प्रश्नावर बावनकुळे स्पष्ट उत्तर देऊ शकले नाही. विशेष म्हणजे यावेळी अजित पवार पक्षाचे शिवाजीराव गर्जे हे त्यांच्यासोबत होते.
लाडक्या बहिणींना विशेष आमंत्रण शपथविधीसाठी देण्यात येणार :
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक विजयात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा असल्याची आकडेवारी समोर आली आहे. लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केल्याने त्यांचे सख्खे भाऊ सत्तेत आले आणि सावत्र भाऊ सत्तेपासून दूर राहिले, असे भाजप नेते सांगत आहेत. लाडक्या बहिणींचे महत्त्वाचे स्थान लक्षात घेऊन महायुती सरकारच्या शपथविधीला निमंत्रित बहिणींना बोलाविण्यात येणार असल्याची माहिती कळते आहे.
अशा प्रकारे सुरू आहे शपथविधी सोहळ्याची तयारी :
– शपथविधीसाठी एकूण ३ स्टेज असणार
– मुख्य मंच ६० बाय १०० फुट
– उजव्या आणि डाव्या बाजुला ६० बाय ५० चे दोन मंच
– उजव्या बाजपुच्या मंचावर संत – महंत , सन्मानीय व्यक्ती
– डाव्या बाजुला महापुरुषांच्या प्रतिमा – सांस्कृतिक कार्यक्रम होतील
– ३० ते ४० हजार आसनव्यवस्था
– मंचासमोर आमदार-खाषदार, निमंत्रीत, व्हीव्हीआयपी
– चोख पोलिस बंदोबस्त
– सर्वसामान्यांच्या प्रवेशाकरिता ३ प्रवेशद्वार