Maharashtra CM : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला 230 जागा मिळून देखील अद्यापपर्यंत महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर दावा केला. मात्र भाजपच्या 132 जागा निवडून आल्यामुळे भाजपने मुख्यमंत्रिपद आपल्याकडे ठेवल्याची माहिती आहे.
तर आता गृहमंत्रिपद मिळावं, यासाठी एकनाथ शिंदे यांनी मागणी केली आहे. मात्र भाजप गृहमंत्रिपद द्यायला तयार नसल्याची माहिती आहे. या सर्व गोंधळात सरकारचा शपथविधी रखडला आहे. दरम्यान, भाजपचे वरिष्ठ नेते आणि कुलाबा मतदारसंघाचे आमदार राहुल नार्वेकर यांनी महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख सांगितली आहे.
विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर राहुल नार्वेकर साई दरबारी पोहचले. साईंच्या समाधीचं दर्शन घेतलं. राज्याला सक्षम सरकार मिळालं आहे. राज्याचे कल्याण होवो, अशी प्रार्थना राहुल नार्वेकरांनी साईं चरणी केली. यावेळी 5 तारखेच्या सुमारास शपथविधी होऊन सरकार स्थापन होणार असल्याची माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.
5 डिसेंबरला दुपारी 1:00 वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार. 3 डिसेंबरला गटनेता निवडीसाठी भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांची दुपारी 1:00 वाजता बैठक होणार असून, आमदारांच्या बैठकीसाठी नवी दिल्लीतून निरीक्षक येणार असल्याचं सांगितलं आहे.
भाजपा कोअर कमिटीची अमित शाह यांच्यासोबत 2 डिसेंबरला व्हिसीद्वारे बैठक होणार आहे. तर नवनिर्वाचित आमदारांची प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व्हिसीद्वारे बैठक घेतली. सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोअर कमिटीची बैठक होणार.