राज्यातील ‘5 वी ते 8 वी’चे वर्ग ‘या’ तारखेपासून होणार सुरू

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई –  राज्यातील इयत्ता 5 वी ते 8 वीच्या शाळा येत्या 27 जानेवारीपासून सुरु होतील, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.  नुकतीच शिक्षण विभागाची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.

मंत्री वर्षा गायकवाड यांनी सोशल माध्यमावर  व्डिडीओ पोस्ट करत देखील यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील शाळांमध्ये इ.५ वी ते ८ वीचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात मंजुरी दिली आहे. येत्या २७ जानेवारीपासून कोरोनासंबंधित सगळी खबरदारी घेऊन हे वर्ग उघडले जातील. विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेत कुठलीही कसूर राहणार नाही, अशी खात्री पालकांना देते.”

दरम्यान या बैठकीदरम्यान, राज्यातील शाळांच्या गुणवत्तेचा जिल्हानिहाय आढावा घेऊन त्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांची आखणी करून राज्यातील शालेय शिक्षणाचा रोड मॅप तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. शालेय शिक्षण विभागाचे व्हिजन २०२५ असे सादरीकरण शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आले.

यावेळी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे संचालक राहुल द्विवेदी, परीक्षा मंडळाचे संचालक दिनकर पाटील व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग यापूर्वीच सुरु झाले असून आता येत्या २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. गायकवाड यांनी दिली. शाळा सुरु करताना विद्यार्थी व शिक्षक यांची कोविडबाबत काळजी घेण्यात यावी व सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री  ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.