युती हल्ले प्रतिहल्ल्यात तर विरोधक शांत; सत्तासुंदरीची माळ पडणार कोणाच्या गळ्यात?

मुंबई : आपापल्या भूमिकेवर ठाम रहात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकमेकांवर हल्ले चढवण्यात मश्‍गुल असल्याने राज्यातील सरकार स्थापनेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला, आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश मिळाल्याचे सांगत त्यांनी या परिस्थितीकडे थांबा व पहा धोरण अवलंबले आहे. तर शिवसेनेकडून वारंवार हल्ला करण्यात येऊनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या साऱ्या प्रकाराबाबत दोन दिवस मौन पाळणे पसंत केले आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवरून मागे हटणार नसल्याचे शिवसेनेने शुक्रवारी पुन्हा जाहीर केले. आमची मुख्यमंत्रीपदाची मागणी कायम आहे. जर आम्हाला वाटले तर आम्ही दोन तृतियांश बहुमताने सरकारने स्थापन करू शकतो. पण हा काही त्यांना अल्टीमेटम नाही. कारण ती मोठी माणसे आहेत, असे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी सांगितले. ते म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेने 50-50 सत्तावाटपाला जनादेश दिला आहे. त्याची अंमलबजावणी झालीच पाहीजे.

तर भारतीय जनता पक्षाचे मंत्री सुधीर मुनगुंटीवार म्हणाले सात तारखेपर्यंत सरकार स्थापन झाले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल. राज्यात वेळेत सरकार स्थापन झाले नाही तर राष्ट्रपतींना हस्तक्षेप करावा लागेल. मात्र, त्यापुर्वी काही तरी चांगले निष्पन्न होईल. मुख्यमंत्रीपद रोटेट करावे अशी शिवसेनेची मुख्य मागणी आहे, मात्र भाजपाने त्यासाठी यापुर्वीच देवेंद्र फडणवीस यांचे नाव त्यासाठी निश्‍चित केले आहे.

राज्यपालांकडून गृहमंत्र्यांना माहिती
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी राज्यातील घडामोडींची केंद्राला माहिती दिली. राज्यपालांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याश संपर्क साधला, अवकाळी पाऊस आणि पिकाच्या नुकसानीची माहिती दिली. त्याचबरोबर राज्यातील राजकीय स्थितीचीही कल्पना दिली. राजकीय स्थितीची कल्पना दिल्याचे सूत्रांनी खात्रीपूर्वक सांगितले

उध्दव ठाकरे – शरद पवार यांच्यात चर्चा
शिवसेना नेते संजय राऊत यांनी यांनी सकाळी पवार यांच्या निवासस्थानी जाऊन पवार यांची भेट घेतली. त्यावेळी पवार आणि उध्दव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याचे विश्‍वासनीय वृत्त आहे. मात्र दोन्ही नेत्यांबाबत एक शब्दही उच्चारला नाही. माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, युतीने एकत्रित निवडणूक लढवली होती. त्यांच्या बाजूने जनादेश आहे. त्यामुळे त्यांनी सरकार स्थापन करावे. राष्ट्रवादीबाबत म्हणाल तर आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल आहे. तो आम्ही स्वीकारला आहे.

या सर्व बाजूचा विचार करताना महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी काय वळण घेणार याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here