महाळुंगे इंगळे – दोन भामट्यांनी चक्क बॅंकेची भिंत फोडून धाडसी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पाईट (ता. खेड) येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र येथे शनिवारी मध्यरात्री घडली.
चोरट्यांनी बॅंकेची भिंत पाडून बॅंकेत प्रवेश केला व स्ट्रॉंग रूमपर्यंत पोहचले; मात्र तिजोरी उघडण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात रविवारी (दि. 11) रात्री उशिरा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिकेत अशोक देशपांडे (वय 32, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार, दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्राप्त झालेल्या माहिती नुसार, खेड तालुक्यातील पाईट येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत शनिवारी (दि. 10) मध्यरात्रीनंतर दोन अज्ञात चोरट्यांनी बॅंकेच्या बाथरूमची भिंत पाडून मोठे भगदाड पाडले. त्याच भगदाडातून बॅंकेत प्रवेश केला. बॅंकेतील दोन लाकडी दरवाजे आणि लोखंडी चॅनलचे गेट तोडले. बॅंकेतील सामान अस्ताव्यस्त फेकले. त्यानंतर बॅंकेच्या स्ट्रॉंग रूममध्ये शिरून स्ट्रॉंग रूममधील तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला; मात्र चोरट्यांना तिजोरी उघडता आली नाही. तिजोरी उघडताना न आल्याने चोरट्यांना बॅंकेतून काहीही चोरता आले नाही. सकाळी बॅंकेत आलेले शाखा व्यवस्थापक अनिकेत देशपांडे यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादी नुसार, अज्ञात चोरट्यांवर चाकण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल ढेकणे व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.