Maharashtra Bandh : राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीने उद्या शनिवारी (दि. 24 ऑगस्ट) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदची तयारी सुरु असतानाच आता हायकोर्टाकडून या बंदची परवानगी नाकारण्यात आली आहे. वकील गुणरत्न सदावर्तेंसह इतरांनी बंदविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर तातडीची सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने म्हंटले की, कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
न्यायालयात युक्तीवाद करताना वकील सुभाष झा म्हणाले, या बंदमुळे जनजीवन विस्कळीत होणार आहे. सर्वसामान्य जनतेला त्रास होणार आहे. राजकीय पक्षांनी पुकारलेले बंद असंवैधानिक ठरवण्याचा हायकोर्टाला अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा संदर्भ देत युक्तिवाद केला. सरकार असे बेकायदेशीर बंद रोखत नसेल तर कोर्टानं हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी अॅड सुभाष झा यांनी केली.
पुढे बोलताना झा म्हणाले, सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करणाऱ्या लोकांविरोधात सरकारने प्रतिबंधक पावले उचलली पाहिजेत. कोणालाही सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करण्याचा अधिकार नाही. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारने पार पाडलीच पाहिजे. कोणतंही विरोध प्रदर्शन हे कायदेशीरच मानलं पाहिजे. बदलापुरातील ज्या घटनेसाठी विरोध होतोय तो योग्यच आहे. दोन लहान मुलींच्या बाबतीत जे काही घडलं त्यासाठी आरोपीला फाशीच झाली पाहिजे. पण त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणं गरजेचंय, त्यासाठी संपूर्ण राज्याला वेठीस धरणं चुकीचं आहे.
अॅड गुणरत्न सदावर्ते न्यायालयात युक्तीवादादरम्यान म्हणाले, पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे. दोषी पोलिसांवर सरकारनं कारवाई केली आहे. राज्य सरकारनं SIT स्थापन केली आहे. मग हा बंद कशाला? बदलापूर स्थानकावर झालेल्या दगडफेक घटनेचे, फोटो सदावर्ते यांनी हायकोर्टात सादर केले. अश्या प्रकारच्या दगडफेकीचे समर्थन कसं करणार? असा सवाल सदावर्तेंनी केलाय.
दरम्यान, आता बंदला परवानगी नाकारल्यानंतर उद्याच्या बंद संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची काय प्रतिक्रिया येते पहावे लागणार आहे. न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर आता उद्याचा बंद रद्द करण्यात येईल? किंवा त्यात बदल करण्यात येईल हे पहावे लागणार आहे.