मुंबई – विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे नाना पटोले यांनी आपला राजीनामा सादर केला.
राज्यात काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग आला आणि या पदासाठी नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे पटोले यांनी आज आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच काॅंग्रेस हायकमांडकडून महाराष्ट्र काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाचा पदभार विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आहे.
नवीन विधानसभा अध्यक्ष कोण ?
नाना पटोले यांच्या रिक्त जागेवर काॅंग्रेसच्या प्रमुख तीन नेत्यांची नावं चर्चेत आहेत. त्यात आमदार संग्राम थोपटे, आमदार सुरेश वारपूडकर, आमदार अमीन पटेल यांच्या नावाचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.